अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- महावितरणचा बडतर्फ कर्मचारी सुभाष माधवराव भोगाडे याने महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे (वय 39 रा. तपोवन रोड, व्दारका नाशिक) यांच्यावर बैठकीत शाईफेक करून शिवीगाळ, दमदाटी केली.

याप्रकरणी बुरंगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बडतर्फ कर्मचारी भोगाडे विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान कोतवाली पोलिसांनी आरोपी भोगाडे याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बुरंगे हे बुधवारी अहमदनगर महावितरण कार्यालयात प्रमोशन पॅनलच्या कामकाजाकरीता आले होते.

यावेळी महावितरण कार्यालयात बैठक सुरू असताना भोगाडे याने दालनात येऊन मोठमोठ्याने आरडाओरड करीत मला चुकीचे बडतर्फ का केले, असे म्हणून त्याने शिवीगाळ करायला सुरूवात केली.

त्याने सोबत आणलेल्या बाटलीतून काळ्या रंगाच्या शाई सदृश्य पदार्थ माझ्या अंगावर टाकला. बैठकीच्या टेबलवरही शाई सांडली.

यावेळी उभा असलेल्या कर्मचार्‍यांनी त्याच्या हातातून बाटली घेऊन त्यास धरायला गेले असता, त्याने माझ्या अंगावर धावून येऊन मला ढकलून दिले.

तुला व तुझ्या घरच्यांना बघून घेतो, घरी येऊन तुला मारीन, अशी धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे बुरंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.