अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील लोणी येथील हॉटेल पाकिजामध्ये काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या डोक्यात टणक वस्तूने घाव घालून या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला.

सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी ती उघडकीस आली. खुनाचे कारण समजू शकले नाही. रंजना ऊर्फ अंजना मोहिते (वय अंदाजे ५९) असे या मूळच्या केडगाव येथील राहाणाऱ्या महिलेचे नाव आहे.

अंजना या लोणी- संगमनेर रस्त्यावरील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या हॉटेल पाकिजामध्ये १० ते १५ वर्षांपासून कामास होती. हॉटेलमधील एका छोट्याशा खोलीत वास्तव्यास होती.

हॉटेल मालक अजिज शेख सकाळी आठ वाजता हॉटेलवर आले असता, त्यांनी या महिलेस आवाज दिला; मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी तिच्या खोलीच्या दिशेने जाऊन पाहिले असता खोलीचा दरवाजा उघडा दिसला.

आत डोकावले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अंजना यांचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य बघून हॉटेल मालक शेख यांना घक्का बसला.

शेख यांनी याबाबतची माहिती लोणी पोलिसांना देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून संबंधीत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला.

या कामगार महिलेचा खून कुणी व कोणत्या कारणास्तव केली, याचा तपास लोणी पोलीस करीत आहेत. या महिलेच्या खुनामुळे लोणी परिसरात खळबळ उडाली असून लोणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत एका व्यक्तीस संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.