सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत.

माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनीसमस्या मांडल्या आहेत.

यामध्ये शिवसेना सध्या राज्यात सत्तास्थानी असून अनेक महत्त्वाची खातीही पक्षाकडे (Party) आहेत. मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडेच आहे. अशा परिस्थितीत सांगलीत प्रत्येक तालुक्यात व शहरात पक्ष वाढायचा असेल तर त्या ठिकाणची लोकांची कामे झाली पाहिजेत.

अनेकदा पदाधिकारी शिवसेनेच्या मंत्र्यांना निवेदन देतात, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. स्थानिक पातळीवर ही कामे होऊन पक्षाचे अस्तित्व दिसले पाहिजे. राष्ट्रवादी (Ncp) व काँग्रेसचे अनेक मंत्री सतत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. तुलनेने शिवसेना मंत्र्यांचे दौरे होत नाहीत, अशा समस्या यावेळी मांडल्या आहेत.

यावर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या की, स्थानिक पातळीवर लोकांची कामे झालीच पाहिजेत.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा पक्षाला होणार. स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामेही व्हायला हवीत, शिवसेनेचे जे मंत्री भेटतील त्यांच्यापर्यंत सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचवून त्यांना येथील कामे करण्यासाठी आग्रह करेन, असे त्यांनी सांगितले आहे.