file photo

Ahmednagar News : शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ जवळ आल्याने सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत असताना हे तिघे मात्र सकाळपर्यंत मुंबईत पोहचले नाहीत. राज्यसभा निवडणुकीतही हे आमदार मतदानाच्या दिवशी मुंबईत उशिरा पोहोचले होते.

निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला असला तरी राष्ट्रवादीचे तीन आमदार अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत. यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश आहे.

मात्र ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मुंबईत दाखल झालेले नाहीत, तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने आतापर्यंत येऊ शकले नसल्याचे समजते. मात्र दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.