अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. यातच कोरोनाच्या नव्या व्हेरियंतच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता लसीकरणाचा एक नवा चॅप्टर सुरु होतो आहे.(child vaccination) 

आता प्राधान्याने 15 ते 18 वर्ष वयोगटातील 60.13 लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस टोचली जाणार आहे. त्याची सुरुवात आज सोमवार 3 जानेवारीपासून होत आहे.

दरम्यान लसीकरणाच्या या नव्या अध्यायासाठी आरोग्य विभागाची टीम सज्ज झाली आहे. दरम्यान या लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर, 60 वर्षावरील व्यक्ती व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

मात्र त्यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन किमान 39 आठवडे पूर्ण होणे गरजेचे आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेत 15 वर्षांवरील मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज आहे.

त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आजपासून लस टोचली जात आहे. कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो तर कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देता येतो.

तसेच शाळा, महाविद्यालयांतच विद्यार्थ्यांना लस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार श्रीरामपूरसह अन्य ठिकाणी नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि शाळा/कॉलेज चे आयडेंटिटी कार्ड लागणार आहे.