Ahmednagar Politics : राजकारणात विखे पाटील आणि पवार कुटुंबातील संघर्षाची नेहमीच चर्चा होती. दर निवडणुकाच्यावेळी याचा प्रत्यय येतो. मात्र आमच्यात असा कुठलाही वैयक्तिक संघर्ष नाही. केवळ राजकीय भूमिका वेगळ्या असल्याने मतभिन्नता आहे. असे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विखे यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये विखे पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले. ‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही विखे पाटील म्हणाले.

इतर नेत्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकर सरकार आणावे, अशी आपली इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मितभाषी, संयमी आहेत.

मात्र, त्यांनी चुकीचे लोक आपल्यापासून दूर केले पाहिजेत. उपमुख्यमंत्री अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचे नाही आणि कोणताच सल्लाही द्यायचा नाही, असेही विखे पाटील म्हणाले. यापुढील काळात विरोधी पक्ष नेता नव्हे तर मंत्री व्हायला आवडेल असेही ते म्हणाले.