Maharashtra News :काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता उलट करुणा मुंडे यांनीच पक्ष स्थापन करण्यासाठी माझ्याकडून ४० लाख रुपये घेतले असल्याची फिर्याद भारत संभाजी भोसले यांनी संगमनेर पोलिसात दिली आहे.

यावरुन करुणा मुंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मुंडे यांनी भारत भोसलेंवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कोंची येथील रहिवासी भोसले यांच्याकडून करुणा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्याकरिता ४० लाख रुपये घेतले. विद्या संतोष अभंग यांच्या मालकीचा घुलेवाडी येथील बंगला पक्षाच्या कार्यालयासाठी राहील,

असे दाखवि ण्यासाठी साठेखत करून तशी नोंद करण्यात आली होती. अभंग यांना करुणा मुंडे यांनी २० लाख इतकी रक्कम उसनवार पावती दस्ताने अदा केली.

करुणा मुंडे पक्ष काढत नाही, असे भोसले आणि अभंग यांच्या लक्षात आल्याने यांनी मुंडे यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर मुंडे म्हणाल्या की, इतक्या लवकर पक्षाची नोंदणी होत नाही.

जर तुम्ही पक्ष काढला नाही मग तुम्ही ३४ लाख ४५ हजार रुपये कशासाठी घेतले असे म्हणत भोसले यांनी करुणा मुंडे यांच्याकडे पैशांची मागणी केली असता मुंडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

तसेच हा दिवाणी न्यायालयाचा विषय आहे, असे सांगत उलट माझ्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अशी तक्रार भोसले यांनी केली आहे.

या प्रकरणी भोसले यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी करुणा मुंडे-शर्मा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.