Maharashtra Politics : सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरचा संपूर्ण फोकस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आहे. मात्र, जसजशी ही प्रक्रिया पुढे जाईल, तसे एक पांढरी टोपी आणि दुसरी काळी टोपी असलेल्या महत्वाच्या व्यक्तींच्या निर्णयाला महत्व येणार आहे.

म्हणजेच विधनसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे लक्ष लागणार आहे. सध्याचा पेच पहाता यापुढे अनेक कायदेशीर प्रक्रिया होणार असल्याची चिन्हे दिसून लागली आहेत. एकीकडे सरकार वाचविण्याचे तर दुसरीकडे नवे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांचे निवाडे आणि आदेश महत्वाचे ठरणार आहेत. यातील पहिला आदेश शिवसेनेच्या गटनेतेपदासंबंधी झिरवळ यांनी दिला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांनी शिंदे यांचा दावा फेटाळला आहे.

पाठिंब्याचे पत्र देणाऱ्या आमदारांच्या सह्या तपासणे वगैरेंसह विधानसभेतील मतदान आणि इतर कामकाज यासंबंधी विधानसभा अध्यक्षांना महत्व येणार आहे. तर अधिवेशन बोलाविणे, सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाला निमंत्रण देणे, राजीनामे मंजूर करणे वगैरे अनेक मुद्द्यांवर राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.