अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात एकही तालुका असा नाही जिथे सध्या स्थितीला चोरटयांनी धुमाकूळ घातला नसेल. घरे, दुकानापाठोपाठ आता चोरट्यांची नजर देवांच्या मंदिरांवर गेली आहे.(Theft)

नुकताच असाच काहीसा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई, इमामपूर शिवारातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष केली आहे.

रविवारी मध्यरात्री मंदिरामध्ये चोरी करत विविध वस्तू चोरून नेल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, जेऊर गावातील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, पंचपाळे, ताट याची चोरी केली.

तसेच इमामपूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात तीन किलो वजनाचा पितळी घोडा, तसेच पाच किलो वजनाची एक घंटा व सात किलो वजनाच्या दोन घंटा चोरट्यांनी चोरून नेल्या.

इमामपूर येथील मळगंगा माता मंदिरातील एक समई व दोन घंटा तसेच इमामपूर घाटातील गणपती मंदिर येथील समई व दोन घंटा चोरून नेल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.