अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- अकोले तालुक्यातील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगरदरीत काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रस्ता नसल्याने पायी जाऊन या गांजाच्या शेतीचा छडा लावला. अन सलग दोन दिवस कारवाई करून पोलिसांनी तब्बल २ लाख ७० हजार रूपये किंमतीची २७० किलो गांज्याची ओली झाडे ताब्यात घेतली.

याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातीतल वारंघुशी येथील कळम देवीच्या डोंगर दरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली.

त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. पथकाने गुरूवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. मात्र येथे वाहनाने जाणे शक्य नसल्याने या पथकाने सुमारे तीन किलोमिटर डोंगर दरीत पायी जात कारवाई सुरू केली. यावेळी या शेतात इतर पिकांबरोबर गांजाची झाडे बहरलेली आढळून आली.

गुरूवारी उशिर झाल्याने व अंधार पडल्याने या पथकाने ४ किलो ६०० ग्रॅम झाडे तोडून ताब्यात घेतली. शुक्रवारी पुन्हा सकाळी या पथकाने घटनास्थळी जाऊन उर्वरीत कारवाई केली. या कारवाईत एकूण तब्बल २७० किलो हिरवी गांजाची झाडे ताब्यात घेतली. तसेच वरील चार जणांना अटक करण्यात केली.