अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर चक्क ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले. त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले जात आहे.(Kalsubai Peak) 

दिव्यांगांना ऊर्जा मिळण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्षदिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष होते.

राज्यातून विविध जिल्ह्यांतून ५५ दिव्यांग सहभागी झाले होते. यामध्ये सात महिला सहभागी होत्या. सर्वांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता चढाईला सुरूवात केली.

शेतातील पायवाट, काही ठिकाणी बांधलेल्या पायऱ्या व काही ठिकाणी कोरलेल्या पायऱ्या, अवघड लोखंडी शिड्या सर करत काठी- कुबड्यांचा आधार घेत सर्व दिव्यांग रात्री सात वाजता कळसुबाईच्या शिखराजवळील विहिरीजवळ मुक्कामी थांबले.

एक जानेवारीचा सूर्योदय होण्यापूर्वीच पहाटेच ते कळसुबाईच्या शिखरावर जाऊन बसले. सर्वोच्च शिखरावरून नव्या वर्षाच्या सुर्याचे दर्शन सकाळी सव्वासातला झाले. एकमेकांचे अभिनंदन करून सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीस प्रारंभ झाला.