अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे निर्बंधांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. दररोजची धडकी भरवणारी आकडेवारी पाहता प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

यातच राज्यातील एका महत्वाच्या जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती कार्यालय,आरोग्य कर्मचारी,

उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत असताना,

राज्य आणि स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेऊन तिसऱ्या लाटेला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच हा महत्वपूर्ण निर्णय औरंगबाद मध्ये घेण्यात आला आहे.

दरम्यान या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लिखित स्वरुपात देण्याच्या सूचना सुध्दा यावेळी देण्यात आल्या आहेत.

शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. तसेच शहरप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे.