file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  सध्या चर्चेत असणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले आहेत.

आता पुन्हा त्यांनी कोरोनाची तिसरी लाट, माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले असून, यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर हे प्रतिक्रिया देत म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या नावावरती कोरोनविषयी असे गैरसमज पसरवणे चुकीचं आहे.

पुढे बोलताना दाभोलकर म्हणाले की, शासनाने आता बुस्टर डोस घेण्यास सांगितले असून, तो डोस घेणं देखील आवश्यक आहे. कोरोनाविषयी असे गैरसमज पसरविने आणि ते देखील वारकरी संप्रदायाच्या नावावरती हे चुकीचे आहे.

‘नवसा सायासे कन्यापुत्र होती, तर का करणे लागे पती’, असे तुकाराम महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी आपल्याला कार्यकारणभाव सांगितला होता.

मग जी वारकरी परंपरा सांगते तिच्या नावावर अशाप्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे ही चुकीची गोष्ट आहे. इंदुरीकर महाराज यांनी ‘माळा काढणाऱ्यांसाठीच तिसरी लाट असणार आहे’ अशा स्वरुपाचं वक्तव्य केले आहे.

माझ्यामते ते अशास्त्रीय विधान आहे. कोरोना कशामुळे होतो व तो टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी शासन आपल्याला परत परत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती देत आहे.

कोरोना हा एक विषाणूजन्य आजार असून, त्याच्यापासून प्रतिबंध करायचा असेल तर आपण सर्वांनी लस घेणं गरजेचं आहे. असेही मत दाभोलकर यांनी व्यक्त केले आहे.

याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले होते.

गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते.

महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुढे बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिले? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले.

४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले.

टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचे म्हंटले आहे.