अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Organic Faarming: भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आणि देशभरात असे अनेक शेतकरी (Farmers) आहेत, जे आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ज्याने आपल्या मेहनतीच्या आणि उच्च इच्छाशक्तीच्या जोरावर शेती (Farming) करण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि आजच्या काळात तो आपल्या गावातील नव्हे-नव्हे तर पंचक्रोशीतील यशस्वी शेतकरी आहे.

या प्रगतीशील शेतकऱ्याचे नाव आहे सुदाम साहू. सुदाम साहू ओडिशा राज्यातील बरगढ़ येथील मौजे काटापाली या लहानश्या गावात राहतात.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे, आपल्या राज्यातील सीड मदर (Seed Mother) अर्थात बीजमाता राहीबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांनी दुर्मिळ जातीच्या बियाण्यांचा संग्रह करत. पारंपरिक पिकांच्या वाणांची जोपासना केली आहे. या पद्धतीनेच सुदाम साहू या शेतकऱ्याने देखील कार्य केले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुदाम साहू हे 2001 पासून देशी बिया गोळा करण्याचे काम करत आहेत. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जास्तीत जास्त स्वदेशी बियाणांचाच वापर करावा, हाच त्यांच्या देशी बियाणे जमा करण्याचा उद्देश आहे.

सुदाम साहू सांगतात की, ते त्यांच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला देशी बियाणे पुरवतात आणि त्याच बरोबर देशभरातील उर्वरित शेतकऱ्यांना देशी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

हजारो शेतकऱ्यांच्या हाताला दिले काम
शेतकरी सुदाम साहू सांगतात की, त्यांना सध्या देशभरातून 4000 क्विंटल धानाच्या देशी बियाण्यांच्या ऑर्डर मिळतं आहेत. याशिवाय ओडिशा, हरियाणा, बंगाल आणि उत्तर प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांतील शेतकरी शेतकरी साहूच्या बियाण्यांनां विशेष पसंती दाखवत आहेत.

याशिवाय आजच्या काळात त्यांनी 1500 हून अधिक शेतकऱ्यांना काम दिले आहे. हे हजारो शेतकरी साहूला 4000 क्विंटल देशी बियाणे पिकवण्यासाठी मदत करतात. निश्चितच सुदाम साहू यांनी शेती व्यवसायात केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे आणि यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होत आहे.

शेतकरी साहू यांच्या मते, आधी ते सेंद्रिय शेती करत होते आणि देशी बियाण्यांचा वापर करून चांगला बक्कळ नफा कमवत होते. आता साहू यांना देशाच्या विविध राज्यातील शेतकरी सेंद्रिय शेती आणि देशी बियाणांचे प्रशिक्षण देण्यासाठी बोलावण पाठवतात.

साहू सांगतात की, त्यांच्याकडे आजच्या घडीला वर्कशॉपसाठी 25 ते 30 पर्यंत प्रशिक्षणासाठी बुकिंग आहे. याशिवाय साहू सोशल मीडियाच्या मदतीने शेतकऱ्यांना मदत करत आहेत. ते म्हणतात, “अलीकडे, सोशल मीडियाच्या मदतीने त्यांनी सुमारे 2200 किलो भाजीपाला विकण्यात शेतकऱ्यांना मदत केली.

वास्तविक या शेतकर्‍यांना बाजारात त्यांच्या भाजीपाल्याची किंमत 10 ते 20 रुपये किलो दराने मिळत होती, मात्र साहूंच्या मदतीने या शेतकर्‍यांचा भाजीपाला 50 रुपये किलोने चांगल्या भावाने विकला गेला. निश्चितच साहू शेतकऱ्यांसाठी चांगले कार्य करत असून ते अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत सिद्ध होत आहे.

शेतीपायी सरकारी नोकरी सोडली
शेतकरी सुदाम साहू यांनी 2001 मध्ये सरकारी नोकरीची ऑफर न स्वीकारून शेतीचा खडतर पर्याय निवडला. मात्र परिवारांची इच्छा होती की साहू यांनी सरकारी नोकरीची ऑफर स्वीकारावी.

कारण की त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मात्र शेतीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आणि देशी बियाणे आणि सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सुदाम आपल्या यशाचे सर्व श्रेय त्याच्या आजोबांना देतात.

सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण
2001 मध्ये शेतकरी सुदाम साहू यांनी आपल्या महाराष्ट्रात येऊन वर्धाच्या गांधी आश्रमात जाऊन सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यानच साहू यांना देशी बियाण्यांचे फायदे कळले आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी देशी बिया गोळा करण्यास सुरुवात केली.

अशाप्रकारे 2012 पर्यंत त्यांनी सुमारे 900 प्रकारच्या देशी धानाच्या बिया गोळा केल्या. यानंतर त्याला इतर पिकांच्या आणि भाजीपाल्यांच्या बियांचीही माहिती मिळू लागली.

या सर्व बिया गोळा करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, सुदाम साहू यांनी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर एक बीज बँक तयार केली आहे, ज्यामध्ये सुमारे 800 चौरस फूट क्षेत्रफळाच्या भिंतींवर वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये बिया टांगल्या आहेत.

साहू यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
शेतकरी सुदाम साहू यांची मेहनत आणि उत्साह पाहून त्यांना शासनाचा जगजीवन राम नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. देशातील शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सुदाम सांगतात.