अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री यांनी एस टी महामंडळाला राज्य शासनात विलगीकरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देऊन,आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस टी कर्मचाऱ्यांना जीवदान द्यावे.

अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पाथर्डी आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबत पाथर्डीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, पाथर्डी आगारातील एसटी कर्मचारी महामंडळाच्या सेवेसाठी कार्यरत आहोत.

मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही.आम्ही सतत तणावाखाली वावरत आहोत. राज्याती इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारेहोणाऱ्या मानसिक त्रासामुळे एसटीच्या ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

तीच मनस्थिती आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात येत आहे.परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही.