file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल 94 उमेदवारी अर्जांपैकी 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, 90 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

वैध उमेदवारांची यादी सोमवारी (दि. 8) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी दिली आहे.

सदर अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासमोर छाननी करण्यात आली. छाननीवेळी ज्या अर्जावर हरकती नोंदविण्यात आल्या

त्यावर सुनावणी घेऊन निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व हरकती निकाली काढत 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरविले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत उतरलेल्या बँक बचाव समिती आणि सहकार पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही.

94 पैकी 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरवत 90 अर्ज वैध ठरवून त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 12 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, या दोन पॅनल व्यतिरिक्त आणखी किती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतात हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल.

यांचे अर्ज ठरले अवैध…

अनु. जाती मतदार संघातून दाखल बाळू नारायण कटके यांचा तर शाखा मतदार संघातून कांतीराम रामचंद्र वराळे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. महिला राखीव तसेच शाखा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या रूपाली अभिजित लुणिया यांचे दोन्ही मतदारसंघातील दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.