अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- लाळ्या खुरकत व लंपी स्कीन डिसिज या संसर्गजन्य आजारांचा संगमनेर तालुक्यात प्रादूर्भाव वाढला असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचे तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन महानंद व संगमनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.

राजहंस दूधसंघ व पंचायत समितीच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांमधील लाळ्या खुरकूत व लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते.

ते म्हणाले, या आजाराचा संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसू लागला आहे. दूधउत्पादकांनी पशूवैद्यकीय अधिकारी व संघाचे स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या जनावरांना आजाराची लक्षणे दिसताच संपर्क करून उपचार करून घ्यावे व लहान-मोठ्या सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी केले.

ते म्हणाले, लाळ्या खुरकूत व लंपी स्कीन डिसिज हे संसर्गजन्य आजार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दोन्ही आजारांची लक्षणे दिसताच जवळच्या सरकारी पशूधन पर्यवेक्षक यांच्याकडे किंवा राजहंस दूध संघाच्या स्वयंरोजगार केंद्र अधिकारी यांच्याकडे संपर्क करून तज्ज्ञ पशूवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे.

संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसाय व्यापक स्वरूपाचा आहे; परंतु त्या प्रमाणात सरकारी पशूवैद्यकीय दवाखाने व पशूवैद्यक यांची संख्या कमी प्रमाणात आहे. ती वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर चर्चा केली आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संगमनेर तालुक्याच्या पशुधनाच्या तुलनेत पशुधन पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्याची विनंती केली आहे.

लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल; परंतु जवळ आलेल्या संकटातून सर्वांनी मिळून मार्ग काढला तर दुग्ध व्यवसायातील उत्पादन खर्च कमी होईल. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजहंस मेडिकलमध्ये स्वस्त दरात औषधे उपलब्ध केलेली असल्याचे ते म्हणाले.