file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम जिह्यातून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

ते मराठवाडय़ातही जाणार असल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही त्यांच्यासोबत असणार हे निश्चित मानले जात होते. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण आजारी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच दोनचार दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं त्यांनी ट्विटमद्ये नमूद केल्याने उलटसुलट राजकीय चर्चांना ऊत आले आहे. पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे.

त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी त्यांना चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे.

त्यामुळं पुढील चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानही या चर्चांना उधाण आलं होतं.

त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे यांचे आजारी पडणं यामुळं राजकीय तर्कवितर्क बांधले जात आहे.