औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्या सभेवरूनच चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. या सभेला १ लाखांहून अधिक लोक येतील असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेकडून या सभेची जोरदार तयारी सुरु आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, ही सभा औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या (Marathwada Sanskritik Mandal) मैदानावर होणार आहे. शिवसेनेच्या अनेक ऐतिहासिक सभा येथे गाजल्या आहेत.

मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे. पण मनसेच्या मागील मेळाव्यातही 300 रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले असा टोला त्यांनी लगावला आहे.

एवढंच नाही तर मीडियाने राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या वेळी लोकांना विचारले तर लोकच सांगतील असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तसेच ३ मे ला रंजन ईद देखील आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राज ठाकरे यांनी सभा पुढे ढकलावी अशी विनंती केली आहे.