गेल्या काही वर्षांत UPI प्रणालीने आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सुलभता आणली आहे. Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अॅप्समुळे शंभर रुपयांच्या बिलापासून लाखो रुपयांच्या व्यवहारांपर्यंत सर्व काही एका टचवर शक्य झालं आहे. पण जसजसे वापरकर्त्यांचे प्रमाण वाढत गेलं, तसतसा UPI प्रणालीवरचा ताणही वाढत गेला. आता हा वाढता दबाव कमी करण्यासाठी NPCI ने काही नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, जे 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील.

1 ऑगस्टपासून नवे नियम
सध्या देशात दरमहा सुमारे 1,600 कोटी UPI व्यवहार होतात. या गगनाला भिडणाऱ्या आकड्यांमुळे सिस्टमवर खूप मोठा भार निर्माण झाला आहे. याचाच अनुभव 12 एप्रिल रोजी आला, जेव्हा सुमारे 5 तासांसाठी UPI सेवा ठप्प झाल्याने लाखो वापरकर्त्यांना व्यवहार करता आले नाहीत. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं – सतत होणाऱ्या API कॉल्स, म्हणजे वापरकर्त्यांकडून वारंवार येणाऱ्या विनंत्या, ज्या सिस्टमवर प्रचंड ताण आणतात.
NPCI चे आदेश
NPCI ने आता बँका व UPI अॅप्सना (Google Pay, PhonePe, Paytm) हे API कॉल्स नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. 31 जुलैपर्यंत प्रत्येक अॅपला केवळ 10 सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या API वर मर्यादा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांमुळे काही गोष्टी वापरकर्त्यांसाठी बदलतील.
यापुढे वापरकर्ते दिवसातून फक्त 50 वेळा बँक बॅलन्स तपासू शकतील. मोबाइल नंबरशी लिंक असलेली खाते माहिती दिवसात 25 वेळांपेक्षा जास्त पाहता येणार नाही. याशिवाय Netflix, SIP सारखी ऑटो-पेमेंट सेवा फक्त नॉन-पीक अवर्समध्येच काम करेल – म्हणजे सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत किंवा रात्री 9:30 नंतर.
सिस्टमवरचा भार कमी करणे आणि क्रॅश होण्याची शक्यता लक्षणीयपणे कमी करणे, यासाठी या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. NPCI च्या मते, UPI प्रणाली अवघ्या 1 मिनिटासाठी बंद झाली, तरी सुमारे 4 लाख वापरकर्ते त्याचा फटका सोसतात. 10 मिनिटांचा क्रॅश 40 लाख लोकांना थांबवू शकतो. त्यामुळे NPCI आता ‘बॅलन्स ऑटो-अपडेट’ सारखी वैशिष्ट्ये अनिवार्य करण्याच्या दिशेने जात आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना बॅलन्स वारंवार तपासण्याची गरज भासणार नाही आणि सिस्टमवरचा भारही कमी होईल.
काय फायदा होणार?
या नवीन बदलांचा थेट परिणाम सामान्य वापरकर्त्यावर होणार असला, तरीही या सुधारणा भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. यामुळे UPI व्यवहार अधिक वेगवान, खात्रीशीर आणि सुरक्षित होतील. वापरकर्त्यांनीही या बदलांना समजून घेऊन आपले अॅप्स अपडेट ठेवणं, ऑटो-अपडेट पर्याय चालू ठेवणं आणि व्यवहार नॉन-पीक वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे.