अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते. सिंधुताई यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी ममता सपकाळ यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

कन्या ममता सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कृपया माई गेल्या असं कुणीही म्हणू नका, असं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे. माईनं केलेल्या कामाच्या स्वरुपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील.

त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात असतील, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली. ‘माई या निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झाले.

निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरू नका. आईसारख्या व्यक्ती या कधीच निघून जात नाहीत तर त्या जिवंत असतात, अशी प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी दिली आहे.

सिंधूताईंची शेकडो मुलं, मुली, जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. आज 5 जानेवारी रोजी सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.