अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- एटीएम फोडून त्यातील रोकड लांबविणार्‍या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पावले उचलली आहेत. पोलिसांनी एटीएम बँक प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली.(Ahmednagar police)

या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बँक प्रतिनिधींना सुरक्षेच्या उपाय योजना सुचविल्या आहेत. त्यानंतर सर्व बँक प्रतिनिधींना पोलिसांनी 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत.

बैठकीस अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) दिपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील विविध बँकांचे एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत. एटीएम फोडणार्‍या तीन प्रकारच्या टोळ्या सक्रीय आहेत.

या टोळ्यांकडून गँस कटींग करून, जिलेटींगचा स्फोट उडवून तसेच एटीएम मशीन वाहनाच्या सहाय्याने ओढुन नेवुन त्यातील रोख रक्कम चोरून नेली जात आहे.

अशा घटना नजीकच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

बर्‍याचशा बँका ह्या एटीएम सुरक्षेबाबत भारतीय रिझर्व बँकेच्या ठरवून दिलेल्या नियामांचे योग्य रितीने पालन करीत नसल्याने एटीएम चोरीच्या घटना घडल्याचे दिसून आलेले आहेत,

अशी भूमीका जिल्हा पोलिसांनी बँक प्रतिनिधींसमोर विषद केली. भविष्य काळात अशा घटना रोखण्यासाठी बँकेने भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना अधीक्षक पाटील यांनी संबंधीतांना दिल्या आहेत.

तसेच भादंवि कलम 149 नुसार नोटिसा दिल्या आहेत. संभवनिय अपराध होण्याची जाणीव असतानाही उपाय योजना केली नाही. त्यानंतर घडलेल्या घटनेस संबंधिताला दोषी धरण्याबाबतची ही नोटिस आहे.

‘या’ उपाययोजन करण्याच्या सूचना

– एटीएम मध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी.

– एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज थेट बँकेच्या मुख्यालयात डीव्हीआर मध्ये स्टोरेज करावा.

– छेडछाड झाल्यास आलाराम सिस्टीम कार्यान्वित करावी.

– छेडछाडीचा प्रकार घडल्यास तशी माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना द्यावी.

– सुरक्षा रक्षक नियुक्तीस विलंब होत असल्यास रात्रीच्या वेळी एटीएम मध्ये रोकड ठेवू नये.

– एटीएम मशीन कायमस्वरूपी मजबूत इमारतीमध्ये बसवावे.