file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. दररोज पाचशे ते हजार नवे रूग्ण समोर येत आहे. यामुळे सक्रीय रूग्णांची संख्या पाच हजारच्या टप्प्यात आहे.

सरकारने सर्व आस्थापना खुल्या केल्या असल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून कोरोनानियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी 10 दिवसात 22 लाखांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा प्रशासनाला विनामास्कची कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा पोलिसांनी गेल्या 10 दिवसांमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनामास्क, सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाईच्या सात हजार 271 केसेस करून 21 लाख 51 हजार 400 रूपयांचा दंड वसूल केला आहे.

तिसऱ्या लाटेची भीती पाहता जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून विनामास्कवर अधिक कडक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये विनामास्क व्यक्तीकडून पोलीस 200 रूपये दंड वसूल करतायत.

20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा पोलिसांनी दोन हजार 249 विनामास्कच्या केसेस करून 11 लाख 21 हजार 500 रूपयांचा दंड वसूल केला.

तसेच सोशल डिस्टसिंगच्या तीन हजार 710 केसेस करून सात लाख 72 हजार 100 रूपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या एक हजार 312 केसेस करून दोन लाख 57 हजार 800 रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.