राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता दोन दिवस उलटले आहेत, यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण ? मंत्रीमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार? यासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना अर्थातच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला यावेळी चांगले यश मिळाले असून आता या तिन्ही पक्षांमधील कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठ्या जिल्ह्यातून अर्थातच अहिल्यानगर जिल्ह्यातून महायुतीच्या कोणकोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला होता. त्यावेळी बीजेपीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. तसेच, नुकत्याच 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सुद्धा मोठा फटका बसला. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर शहर लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीने काबीज केल्यात. पण, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लोकसभेची आणि गेल्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण कसर महायुतीने भरून काढलीये.
महायुतीचे यावेळी तब्बल दहा उमेदवार निवडून आलेत. भारतीय जनता पक्षाला 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 आणि सेनेच्या शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे बबन दादा पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते, राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले, अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप,
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आशुतोष काळे, पारनेर विधानसभा मतदार संघातून अजित पवार गटाचे काशिनाथ दाते, अकोले विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे अमोल धोंडीबा खताळ, नेवासा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठलराव वकीलराव लंघे हे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. आता आपण जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते हे पाहणार आहोत.
भाजपाचे कोणते आमदार नामदार होतील ?
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री आणि दुग्धविकास मंत्री म्हणून उत्तम कारभार पाहिला आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये मोठी भूमिका निभावली आहे. विशेषतः पारनेर, राहुरी आणि संगमनेर येथील विजयात विखे पाटील किंगमेकर ठरलेत. यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे 100% कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव पाथर्डीच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राहुरीतील बीजेपीचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत पण कर्डिले हे माजी मंत्री असून, 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते जिल्हा बँकेचे चेअरमन देखील आहेत. त्यामुळे कर्डिले ऐवजी राजळे यांच्या नावाला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे कोणते आमदार नामदार होऊ शकतात?
नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम भैय्या जगताप हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. जगताप यांनी देखील विजयाची हॅट्रिक साधली असून ते गेल्या मंत्रिमंडळात देखील मंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र गेल्या वेळी त्यांना संधी मिळाली नाही पण यावेळी ते हमखास मंत्री बनतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रचारादरम्यान असेच संकेत दिले होते.कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटातील नवनिर्वाचित आमदार आशुतोष काळे हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. यामुळे काळे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता आहे.
शिंदे गटातील कोणत्या आमदाराला मिळणार संधी ?
संगमनेर आणि नेवासा विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले असल्याने त्यांचा मंत्रिपदासाठी विचार होण्याची शक्यता धूसर आहे. तरीही संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्याने अमोल खताळ हे राज्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे.