Babanrao Dhakane : ज्येष्ठनेते बबनराव ढाकणे यांनी नगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात विस्थापित क्षेत्रातील लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी जुन्याकाळी चळवळ निर्माण केली. त्यातूनच आम्ही घडलो आणि जनहिताची कामे करू शकलो.
पाथर्डी सारख्या दुष्काळी क्षेत्राचे नाव त्यांनी देशपातळीवर पोहोचवले आणि आमच्यासारख्यांना त्यातून प्रेरणा मिळत गेली.
आम्ही आमचे भाग्य समजतो की, त्यांचा सहवास आम्हाला लाभला आणि आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनात काम करत आहोत, अशी सद्भावना माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली.
माजी केंद्रीयमंत्री स्व. बबनराव ढाकणे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पागोरी पिपळगाव येथे आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, आमदार किशोर दराडे, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री, बीडचे माजी आमदार सुनील धोंडे, आदिनाथ शास्त्री महाराज, येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज, आमदार निलेश लंके, तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेश भागवत, सुशीला मोराळे, भगवान फुलसौंदर, सुभाष लांडे जालिंदर वाघचौरे, रामदास गोल्हार, उद्योजक किरण शेटे, अमोल गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, वसंत लोढा, बाळासाहेब सोनवणे, अशोक मोटकर, शिवाजीराव काकडे, दादासाहेब मुंडे, आदी मंचावर उपस्थित होते.
या वेळी बोलातना कर्डिले म्हणाले, जिल्ह्यात प्रस्थापितांचा एकतर्फी कारभार सुरू असताना स्व. बबनराव ढाकणे यांनी पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातून या व्यवस्थेच्या विरोधात सर्वसामान्यांच्या हितासाठी मोठी चळवळ निर्माण केली.
त्यातून प्रेरणा घेत स्वतः मी, आमदार बबनराव पाचपुते, माजी खासदार तुकाराम गडाख यांनी जिल्ह्यात तिसरा पर्याय निर्माण करण्याचा ठरवलं, त्यात आम्हाला काही अंशी यश आलं.
मात्र हे यश तात्कालीक नव्हतं, हे प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देणार होतं. त्यातून सर्वसामान्यांची दखल घेतली आणि आज त्याचीच परिनिती आपण अनुभवत आहोत.
बबनराव ढाकणे यांनी पन्नास वर्षे महाराष्ट्राच्या समाज हितासाठी आपले योगदान दिले. ही सोपी गोष्ट नाही, सभागृहात अनेकदा जनसामान्यांचे प्रश्न ते प्रकर्षाने मांडायचे, भाषणातून त्यांची लोकांसाठी असलेली पोटतिडकी आम्हाला जाणवायची.
बीड जिल्ह्यातून त्यांनी खासदारकी लढवली, तेथूनही यश संपादन केले आणि केंद्रात मंत्रीपद मिळवले, ही साधी सोपी गोष्ट नाही. बबनराव ढाकणेंसारखे व्यक्तिमत्व सामाजिक जीवनात पुन्हा जन्माला येणे शक्य नाही, असे ते शेवटी म्हणाले.
या वेळी राज्यभरातुन ढाकणे यांच्यावर प्रेम करणारे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. बहुतेक वक्त्यांनी ढाकणे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, ऊसतोडणी कामगारांसह तालुक्यातील सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ढाकणे यांनी मोलाचे योगदान दिले, अनेक दुःख पचवून ते स्वतः समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटले, त्यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
बीडचे माजी आमदार सुनील धांडे म्हणाले, स्व. बबनराव ढाकणे यांनी ज्या काळी बीडची लोकसभा लढवली, त्याकाळी आम्ही तरुण वयात होतो, त्यांच्या प्रखर भाषणांनी आम्ही प्रेरित होऊन त्यांच्यासोबत काम केले. ते जिंकले, त्यांचे काम पाहिले. मात्र त्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्या राजकीय व्यवहारात कधीही जातीयवादाचा विषय आम्ही अनुभवला नाही. त्यांनी त्या खासदारकीच्या काळात केलेली कामे बीड जिल्ह्यात आजही अजरामर आहेत.