Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा झालेल्या बैठकीत विधानसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा करण्यात आला.
त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे सह्यांचे निवेदन देखील देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार पवारांसमोर स्थानिक काँग्रेस नेत्त्यांच्या मनधरणीचे आव्हान असेल, असे मानले जात आहे. शरद पवार गटाला बारामतीची जागा खाली झाली असून रोहित पवार यांनी तेथून लढावे असेही येथील काँग्रेसने म्हटले आहे.
त्यामुळे आता काँग्रेसकडून आ.रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून हिरवा कंदील नाही असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. सोमवारी सायंकाळी कर्जत येथील विश्रामगृहावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ही माहिती देण्यात आली.
विधानसभेसाठी ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांच्या उमेदवारीची मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी अॅड. शेवाळे म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
या मतदारसंघातून स्व. आबासाहेब निंबाळकर, दोन पंचवार्षिक निकाळजे गुरुजी, तर एक पंचवार्षिक विठ्ठलराव भैलुमे यांनी काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले आहे. वर्ष २००९ मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर स्व. बापूसाहेब देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता.
२०१४ मध्ये किरण पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. २०१९ ला काही राजकीय तडजोडीअंती ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली. आमदार रोहित पवार काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सहकार्याने आमदार झाले; मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायम मित्रपक्षाला सापत्न वागणूक दिली. कधीच काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाही, अशी टीका शेवाळे यांनी केली.
सचिन घुले म्हणाले, की विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखाच रोहित पवार यांचा आम्ही प्रचार केला आणि त्यांना आमदार केले, मात्र त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसला डावलले गेले.
कर्जत नगराध्यक्षपद, पंचायत समिती सभापतिपद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद यासह इतर पदांवर काँग्रेसला संधी देण्याची गरज होती, मात्र रोहित पवारांनी राष्ट्रवादीलाच जास्तीत जास्त संधी दिली आणि काँग्रेसवर अन्याय केला.
काँग्रेसला स्वतंत्र वाटा द्यायची त्यांची मानसिकता नाही. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे असे घुले यांनी म्हटले.
काँग्रेसचा मतदार जागेवर, राष्ट्रवादीत फाटाफूट
दक्षिणेत काँग्रेसला एकही जागा नाही. कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी. पाच वर्षांसाठी आम्ही ही जागा रोहित पवार यांना दिली होती.
या मतदारसंघात काही प्रमाणात अजित पवारांचा प्रभाव आहे. ते त्यांच्यापासून बाजूला गेल्याने मतांची विभागणी होणार आहे. आमचा काँग्रेसचा मतदार आहे तसाच जागेवर आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला फायदेशीर राहील, असे शहाजीराजे भोसले यांनी सांगितले.