राजकारण

लोकसभेत जाहिरातींवर तब्बल ५९१ कोटींचा खर्च

Published by
Mahesh Waghmare

२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारा भारतीय जनता पक्ष हा सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून समोर आला आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत भाजपकडे रोख आणि बँकेतील पैसा मिळून तब्बल ७,११३.८० कोटींचा निधी शिल्लक आहे. तर त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे ८५७.१५ कोटींचा निधी बाकी आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

वर्ष २०२३-२४ दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या काळात भाजपकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. भाजपने या कालावधीत १,७५४.०६ कोटी रुपयांचा खर्च केला. २०२२-२३ दरम्यान भाजपने खर्च केलेल्या १,०९२ कोटींपेक्षा ही रक्कम ६० टक्के अधिक होती, तर भाजपच्या तुलनेत काँग्रेसने वर्ष २०२३-२४ दरम्यान ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले. वर्ष २०२२-२३ दरम्यान काँग्रेसने १९२.५६ कोटी रुपये खर्च केले होते.

अहवालानुसार भाजपला सद्यस्थितीत बंद करण्यात आलेल्या निवडणूक रोख्यातून वर्ष २०२३-२४ दरम्यान तब्बल १,६८५.६९ कोटी रुपयांचा निधी मिळाला. या कालावधीत इतर देणग्यांद्वारे भाजपला २,०४२.७५ कोटी रुपये मिळाले. यापूर्वीच्या वर्षात निवडणूक रोख्यातून १२९४.१५ कोटी तर अन्य देणग्यांद्वारे ६४८.४२ कोटी रुपये भाजपला मिळाले होते. तर काँग्रेसला वर्ष २०२३-२४ दरम्यान विविध माध्यमांतून १२२५.११ कोटी रुपयांचा निधी मिळाला. यात निवडणूक रोख्याच्या माध्यमातून मिळालेल्या ८२८.३६ कोटींच्या देणग्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपकडून जाहिरातींवर तब्बल ५९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यापैकी ४३४.८४ कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील जाहिरातींवर, तर ११५.६२ कोटी रुपये मुद्रित माध्यमातील जाहिरातींवर खर्च करण्यात आले. वर्ष २०२३-२४ दरम्यान सत्ताधारी भाजपने विमान तथा हेलिकॉप्टरवर १७४ कोटींचा निधी खर्च केला तर उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून १९१.०६ कोटी रुपये दिले.

या काळात झालेल्या बैठकांवर ८४.३२ कोटी आणि मोर्चा, आंदोलन आणि रॅलीवर ७५.१४ कोटींचा खर्च करण्यात आला. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने या कालावधीत इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यम मिळून जाहिरातींवर एकूण २५१.६७ कोटी रुपये खर्च केले. शिवाय राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा-२ वर ४९.६३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०२२-२३ मध्ये आयोजित पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेवर काँग्रेसने ७१.८४ कोटी रुपये खर्च केले होते.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.