Ahmednagar Politics : बंधारे भरल्याने परिसर फुलून दिसतो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्याचे मला समाधान वाटते. नद्यांना आपण आई मानतो. मुळा, प्रवरा नद्यांवरील बंधाऱ्यांवर जाऊन जलपूजन कुठलेही श्रेय घेण्यासाठी किंवा कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही.
मानोरी बंधाऱ्याचे जलपूजन करताना मी कोणावरही राजकीय बोललो नाही. तरी विरोधकांनी माझ्यावर टीका केली. शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. उगाच भावनिक होऊन जाऊ नये, असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मुळा नदीवरील बंधाऱ्यावर माजी खासदार प्रसाद तनपुरे व श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहु कानडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी तनपुरे बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, रखमाजी जाधव, मांजरीच्या सरपंच लताबाई आंबडकर, माजी उपसभापती रवींद्र आढाव, चेअरमन पोपटराव भगत, अरुण नाईक, अशोक विटनोर, भारत विटनोर, कोंडीराम विटनोर, अशोक कुलट, आप्पासाहेब जाधव, जयवंत गुडधे उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, आपण दूरदृष्टीने मुळा नदीवर चार तर प्रवरा नदीवर तीन बंधारे बांधले. त्यानंतर बंधाऱ्यांच्या राखीव पाण्यासाठी माजी मंत्री पद्मसिंह पाटील व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला; परंतु विरोधकांनी यासाठी काही केले नाही.
पण आता समन्यायी पाणी वाटपामुळे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन राखीव पाणी करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार कानडे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार प्राजक्त तनपुरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घालून हे बंधारे भरून घेण्यासाठी धरणातून राखीव पाणीसाठा ठेवण्यासाठी कायदा करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार कानडे म्हणाले, की मागील दोन-तीन वर्षे पाण्याचा एवढा प्रश्न निर्माण झाला नाही; पण यावर्षी पाऊस कमी झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला. जायकवाडीला जाणाऱ्या पाण्यातून बंधारे भरून देण्यात यावे, अशी भूमिका घेतल्याने त्याचा फायदा झाला.
बंधाऱ्याच्या नादुरुस्त फळ्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ. तुम्ही सर्वांनी वाळूचा कणही उचलू न दिल्यामुळेच आज सर्वांना पाणी मिळत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भानुदास चोपडे, विजय जंगले, सोपानराव बाचकर यांनी मांजरी येथे उप कांदा बाजार समिती सुरू करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रकाश आढाव, दादासाहेब कुलट, विष्णुपंत ठोसर, सोपान विटनोर,
लक्ष्मण चोपडे, चांगदेव घोलप, शिवाजी जाधव, कुशिनाथ जाधव, गोरक्षनाथ घोलप, विजय विटनोर, किसन विटनोर, बाळासाहेब विटनोर, पाटीलबा बाचकर, अनिल बिडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते