Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वत्र निवडणुकीचा फीवर पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत काही मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील तब्बल 35 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही शरद पवार गटविरुद्ध अजित पवार गट अशा लढती पाहायला मिळतील.
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता आगामी विधासाभेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट अर्थातच अजित पवार गट आणि शरद पवार गटाने शड्डू ठोकला आहे. या दोन्ही गटांकडून सध्या संपूर्ण राज्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार गटाने या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. शरद पवार गट हा महाविकास आघाडीमध्ये आणि अजित पवार गट हा महायुतीमध्ये समाविष्ट आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या राष्ट्रवादीला अर्थातच अजित पवार गटाला या निवडणुकीत 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे
तर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या राष्ट्रवादीला म्हणजेच शरद पवार गटाला या निवडणुकीत तब्बल 87 जागा मिळाल्या आहेत. यातील 35 जागांवर शरद पवारांचे भिडू अजित पवारांच्या भिडूंना भिडणार आहेत. यामुळे या जागांवरील निवडणूक ही विशेष लक्षवेधी होणार आहे.
राज्यातील बारामती, इंदापूर, आंबेगाव, अहेरी, कागल, कळवा-मुंब्रा, हडपसर, वसमत, बडगाव शेरी, चिपळूण, शिरूर, तासगाव कवठे महाकाळ, इस्लामपूर, उदगीर, कोपरगाव, अणुशक्तीनगर, येवला, परळी, दिज्ञोंगी, श्रीवर्धन, माजलगाव, वाई, सिन्नर, अहिल्यानगर शहर, अहमदपूर, शहापूर, पिंपरी, अकोले, जुन्नर, मोहोळ, देवळाली, चंदगड, तुमसर, पुसद, पारनेर या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कोणकोणते उमेदवार एकमेकांना भिडणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत
अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना संधी देण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात लढत होणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना पुन्हा एकदा या जागेवर संधी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघ : पारनेर मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होईल. महाविकास आघाडी कडून पारनेरमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना पहिल्यांदाच शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आले आहे. तसेच, महायुतीकडून या जागेवर अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघ : या जागेवर महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. तसेच,महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.