Ahilyanagar Politics : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना संधी मिळाली आहे.
ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला गेलीय आणि येथून अजित पवार गटाने पुन्हा एकदा विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सुटली आहे.
येथे पक्षाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खरे तर ही जागा शरद पवार गटाला सुटेल आणि कळमकर येथून उमेदवारी करतील असे आधीच वाटतं होते. पण तरीही या जागेसाठी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात अनेक जण इच्छुक होते.
यामुळे कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत चांगलीच कुरघोडी सुरु झालीय. कळमकर यांच्या उमेदवारीनंतर लगेचच मविआत बंडखोरीचे निशाण फडकवण्यात आलय.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांच्या भिडू विरोधात ‘मविआ’तील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. म्हणून महाविकास आघाडी मधील इतर पक्षांच्या माध्यमातून दबाव तंत्र सुरू आहे की खरंच या जागेवर काँग्रेस आणि उबाठाचे नेते उमेदवारी करणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत या संदर्भात योग्य ते चित्र स्पष्ट होणार आहे. या जागेवर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अर्ज दाखल केलाय. त्यापाठोपाठ ठाकरे गटानेही बंडाचे निशाण हाती घेतले. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
त्यामुळे उमेदवारी शिवसेनेला हवी होती, असा दावा करत ठाकरे गटातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकांचे सत्र घेतले. या बैठकांमधील निर्णयानुसार जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दुसरीकडे अपक्ष म्हणून माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर या देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेली ही बंडाळी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या फायद्याची ठरणार आहे.
यानिमित्ताने ते प्रचारात आघाडीवर गेले आहेत. जोपर्यंत महाविकास आघाडी मधील ही बिघाडी दूर होत नाही तोपर्यंत जगताप प्रचारात आघाडी घेतील आणि जर समजा महाविकास आघाडी मधील इतर पक्षातील नेत्यांनी माघार घेतली नाही तर याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा जगताप यांनाच होणार असा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे.