Ahilyanagar Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने-सामने आहेत. खरे तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे.
मात्र या चिन्हावरून लोकसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहेत. वादाचे कारण म्हणजे निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यापासून साधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हाला अपक्ष उमेदवारांकडून मागणी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीपासून तुतारी म्हणजे ट्रम्पेटला अधिक मागणी आली आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट अर्थातच तुतारी चिन्हावर निवडणूक लढविलेल्या अपक्ष उमेदवारांना जबरदस्त मते मिळाली होती.
म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या शरद पवार गटाच्या उमेदवारांची मते अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात गेलीत अन याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधी शरद पवार गटाने तुतारी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती.
मात्र, निवडणूक आयोगाने चिन्ह कायम ठेवले आहे. म्हणजे आता लोकसभा निवडणुकीत चाललेले तुतारी चिन्ह ‘ट्रम्पेट’ नावाने विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर दिसणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील 12 पैकी 11 जागांवर हे चिन्ह अपक्षांना देण्यात आले आहे.
फक्त राहुरी विधानसभा मतदारसंघात हे चिन्ह अपक्षाला मिळालेले नाही. अकरा जागांवर ट्रंपेट म्हणजेच तुतारीच चिन्ह अपक्षांना देण्यात आले असून यातील सहा जागांवर तुतारी वाजवणारा माणूस विरुद्ध तुतारी म्हणजे ट्रम्पेट आमने सामने येणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सात जागांवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सात पैकी सहा जागांवर म्हणजे अहमदनगर शहर, शेवगाव, पारनेर, कोपरगाव, कर्जत, अकोले या जागांवर ट्रंपेट हे चिन्ह आहे.
श्रीरामपूर, अकोले आणि पारनेर विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रीय समाज पक्षाला ‘ट्रम्पेट’ चिन्ह मिळाले आहे, तर कोपरगावमध्ये बळीराजा पार्टी, संगमनेरमध्ये समता पार्टी व श्रीगोंद्यात सैनिक समाज पार्टीला ‘ट्रम्पेट’ चिन्ह मिळाले आहे. यामुळे या सहा जागांवरील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.