Ahmednagar Breaking : अहमदनगर मतदारसंघातील काही मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांबाबत खा. सुजय विखे यांनी संशय व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी तब्बल १८ लाख रुपये भरून पडताळणीसाठी अर्जही केला.
त्यावरून देखील आजी माजी खासदारांच्या प्रतिकऱ्यांना उधाण आले. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सोशलवॉर उभे केले. दरम्यान आता याबाबत एक महत्वाची बातमी आली आहे.
फेरमतमोजणी होणार नाही, केवळ मशीन तपासणार
बंगळूर येथील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट निर्मिती करणाऱ्या बेल कंपनीच्या अभियंत्याकडून निश्चित केलेल्या दिवशी ४० मतदान केंद्रांवरील बॅलेट कंट्रोल युनिट (बीयू), व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशिन या यंत्रांची तपासणी केली जाईल.
यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? एवढेच तपासले जाईल. फेरमतमोजणी केली जाणार नाही, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.
निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ आदेश
भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत ४० मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शेवगाव (५), राहुरी (५), पारनेर (१०), अहमदनगर शहर (५), श्रीगोंदा (१०) आणि कर्जत जामखेड (५) या केंद्रांवर तपासणी होणार आहे.
४५ दिवस प्रतीक्षा
निवडणूक आयोगाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे एकूण ८ आणि राज्य विधानसभेबाबतचे 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जावर निवडणूक आयोग ४५ दिवस प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. दरम्यान लोकसभेला नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांनी भाजपचे डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला.