Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी, तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी लढत झाली. यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. त्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रमुख राहिली.
दरम्यान खासदार लोखंडे यांचा मतदारसंघाशी नसलेला जनसंपर्क, अंतर्गत संघर्ष, भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण, आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांसह ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, बेरोजगारांची वाढती समस्या, जातीचे ध्रुवीकरण या मुद्दयावरून मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतपेटीतून आपली ताकद दाखवून दिल्याचे सांगतात. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे दिसून आले.
त्यामुळे जनता जनार्दन काय करू शकते व जनतेशी संपर्क असल्यास निवडून येण्यास मोठा हातभार विजयास लागू शकतो हे देखील यातून दिसून आले. त्यामुळे आता उत्तरेत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी जनसंपर्कावर भर देण्यास आतापासूनच सुरवात केली आहे.
त्यामुळे उत्तरेमधील काही भागात विशेषतः श्रीरामपुरात ‘कट्टा’ संस्कृती उदयास आली आहे. सकाळ-संध्याकाळ चौका चौकात ठिकठिकाणी ग्रुप करुन लोक गप्पा करत बसतात. विशेष म्हणजे आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने या कट्ट्यांवर सर्वाधिक हजेरी ही इच्छुक उमेदवारांची दिसते.
सकाळी या पद्धतीने पाटाच्या कडेला, मेन रोडवर, शिवाजी रोडवर, नेवासा रोडवर तसेच रुळाच्या पलिकडे ठिकठिकाणी नागरिकांचे गप्पांचे कट्टे रंगलेले दिसतात. तसेच ते आता रात्रीही जमताना दिसतात. मग ते चहाचे दुकान असो किंवा एखादा चौकातील कोपरा असो. रोज संध्याकाळी वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या वयोगटातील नागरिक हे गप्पासांठी जमतात. त्यामुळे लोकांमध्ये राहण्यासाठी इच्छुक उमेदवारांची या अशा प्रकारच्या लोकांच्या कट्ट्याला पसंती असल्याचे दिसते.
गेल्या काही महिन्यांपासून या कट्ट्टा संस्कृतीने मोठं स्वरुप धारण केलेले आहे. याचे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक तसेच त्यानंतर होणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे, पंचाययत समितांची निवडणूक हेच दिसते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन-तीन दिवसापूर्णी शहरातील पाटाजवळच्या कट्ट्यावर सकाळी सकाळी हजेरी लावली.
बराच वेळ या ठिकाणी लोखंडे हे गप्पा मारत बसले होते. यापूर्वीही ते कधीमधी यायचे. परंतु लोकसभेत पराभूत झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कट्ट्यावर हजेरी लावल्याने त्याची चर्चा सुरु झाली. दुसरीकडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कधी सकाळी तर कधी संध्याकाळी शहरातील वेगवेगळ्या कट्ट्यांवर हजेरी लावून गप्पात रंगलेले दिसतात.
इच्छुक हेमंत ओगले हेही अनेकदा ‘चहा’च्या ठेल्यावर कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारताना दिसतात. त्यामुळे थोडेथोडे करत जे गठ्ठा मतदान मिळवायचे आहे त्यासाठी इच्छुकांनी या कट्ट्याला पसंती दिल्याचे दिसते.