Ahmednagar Politics : गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासनाने शेवगाव तालुक्यावर सातत्याने अन्याय केल्यामुळे मतदारसंघ विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडून आणावा. विधानसभेच्या लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहावे, फक्त आपला माणूस पहा, पक्ष व चिन्ह ऐनवेळी ठरवू . असे सांगत घुले बंधूंनी विधानसभेची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत दिले.
माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे. प्रशासनावर कुणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या हक्काचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज झाली आहे.
तालुक्यातील माणूस विधानसभेची पायरी चढला पाहिजे, असा संकल्प करावा. ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची आहे शेवगावला तीन-तीन आठवडे पाणी मिळत नाही. शेवगाव बसस्थानकाची काय अवस्था आहे.
जलसंधारणाच्या कामांची काय परिस्थिती आहे, असा सवाल करून करीत कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे न पाहता फक्त आपला माणूस पहा, पक्ष व चिन्ह ऐनवेळी ठरवू. गेल्या पाच ते दहा वर्षात आम्ही जे काही उभे केले होते, त्याची तोडमोड झाली. विजेचे दिवे गेले, नळाला पाणी राहिले नाही, पाटपाण्याची तीच अवस्था झाली, बंधाऱ्यांचे गेट तुटले आहेत, ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण सर्वांना संघटित होण्याची गरज आहे.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाल्यानंतर घुले घराण्यातील कुणीही उमेदवारी केली नव्हती. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी घुले बंधूंनी प्रताप ढाकणे यांना पाठिंबा देत सक्रिय प्रचार केला होता. मात्र, प्रताप ढाकणे पराभूत झाले.
आता जर विधानसभा निवडणूक केली नाही तर गेल्या ३० ते ४० वर्षांपासून घुले घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचे काय ? तसेच स्वतःचे राजकीय अस्तित्व व भवितव्य, असा विचार मनात घेऊन तालुक्याची अस्मिता हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून घुले बंधूंनी विधानसभेची तयारी केली आहे.