येत्या 8 दिवसांत ‘अहमदनगर’ नाव गायब होणार ! शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह ‘या’ आस्थापनांवर आता अहिल्यानगर दिसणार

अहिल्यानगर शहरात ज्या चौकांवर अहमदनगर असे नाव आहे, अहमदनगर नावाचे दिशादर्शक फलक आहेत, स्वागत कमानी, उद्याने, रस्त्यांची नावे आहेत त्या ठिकाणी आता अहिल्यानगर असे नाव करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाले आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmedanagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. केंद्रातील मोदी सरकारने अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर असे करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सध्या शहरासहित संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. खरेतर, नामांतरणाचा हा विषय फार जुना होता. यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा देखील सुरू होता.

दरम्यान गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे केले जाईल अशी मोठी घोषणा केली. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यास मान्यता दिली अन याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला.

दरम्यान आता केंद्र सरकारने राज्य शासनाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानंतर आता राज्य सरकारने अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर असे करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकाने या आदेशाची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत शहरातील जुने महापालिका कार्यालय, आरोग्य केंद्र, प्रभाग समिती कार्यालये इत्यादी ठिकाणचे नाव अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्यात आले आहे. पण, शहरात अनेक आस्थापना आहेत, शहराचे नाव बदलले असल्याने आता या आस्थापनांवरील नाव देखील बदलणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने आता शहरातील विविध आस्थापनांसोबत पत्रव्यवहार केला आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सहकारी बँका, शाळा-महाविद्यालये इत्यादी आस्थापनांनी आपला कार्यालयीन पत्ता, तसेच इमारतींवरील नावे बदलून अहिल्यानगर असे करावेत, असे आशयाचे पत्र महापालिका प्रशासनाने पाठवले आहे.

अहिल्यानगर शहरात ज्या चौकांवर अहमदनगर असे नाव आहे, अहमदनगर नावाचे दिशादर्शक फलक आहेत, स्वागत कमानी, उद्याने, रस्त्यांची नावे आहेत त्या ठिकाणी आता अहिल्यानगर असे नाव करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाले आहे. म्हणून पत्ता सांगताना आणि लिहिताना सध्यातरी अहिल्यानगर, ता. जि. अहमदनगर असाच सांगावा किंवा लिहावा लागणार आहे.

दरम्यान नगर तालुका आणि जिल्ह्याचा नामकरणाबाबतची कारवाई ही महसूल विभागाकडून केली जाणार अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. म्हणजेच आगामी काळात नगर तालुका आणि जिल्हा सुद्धा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe