Ahmednagar Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीच्या सदस्यपदी महापालिका आयुक्त, गटविकास अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका,
कनिष्ठ संरक्षण अधिकारी, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार जगताप यांच्या नावाची शिफारस केली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आ. जगताप यांच्यामध्येच !
नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व शहराला मिळाले आहे. त्यांनी नगरसेवक पदापासून काम करायला सुरुवात केल्यामुळे मूलभूत प्रश्न माहिती आहेत. त्यामुळेच नगरकरांनी कामाच्या माध्यमातून विधानसभेच्या सदस्य पदावर पाठवले आहे.
त्यांच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे. ते थेट जनतेच्या संपर्कात राहत असल्यामुळे शहर विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन भाजपाचे सावेडी मंडल अध्यक्ष नितीन शेलार यांनी केले.
पाईपलाईन रोड हनुमान नगर येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरणाच्या कामाला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
आ. जगताप म्हणाले,नगर शहरातील जनतेच्या मतरुपी आशीर्वादामुळेच शहर विकासाला गती मिळाली आहे. नागरिकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होत असते.
सर्वांच्या चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या प्रत्यक्षात सोडवण्यासाठी प्रयत्ना करतो. शहरातील प्रलंबित सर्वच प्रश्नांवर काम सुरू आहे.