राजकारण

आ. शंकरराव गडाखांसह घरातील दोघांवर गुन्हा दाखल होणार? ‘त्या’ नव्या प्रकरणाची चौकशी सुरु

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा तोंडावर आलेल्या असतानाच आता ठाकरेंचे शिलेदार म्हणून पाहिले जाणारे आमदार शंकरराव गडाख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आ. गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती समजली आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीने वनजमिनीवर ताबा व झाडे तोडून इमारत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे.

याबाबत चौकशी सुरू झाली असून लवकरच गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुळा एज्युकेशन सोसायटी २०१८ मध्ये हरित लवादाकडे तक्रार झाल्याने चर्चेत आली होती. लवादाच्या निर्णयानंतर संस्था अडचणीत आली होती. त्याच प्रकरणात तक्रार झाल्याचे समजते,

संस्थेने वनजमिनी ताब्यात घेऊन झाडांची कत्तल करत इमारत बांधणे, बनावट कागदपत्रे तयार करणे असे आक्षेप नोंदवत एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष व विश्वस्तांवर कारवाईची मागणी कुलाबा पोलीसांना दिलेल्या एका तक्रार अर्जात केल्याचे समजते.

मुळा एज्युकेशन सोसायटी विरोधातील अर्जावर कुलाबा पोलिसांनी विविध शासकीय विभागांकडून माहिती मागविली असल्याचे समजते. याप्रकरणात आ. गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य व विश्वस्तांवर गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात होती.

आता हे प्रकरण जर ऐन वेळेला समोर आलं तर मोठी अडचण होऊ शकते. गडाख यांची भूमिका नेमकी कशी असणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office