राजकारण

३६ वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याला शिक्षक आमदारकीची हुलकावणी, काय आहे इतिहास?नेमके काय घडते? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जूनमध्ये पार पडली. आज (मंगळवार) तिचा निकाल लागला. यात शिंदे गटाचे किशोर दराडे हे आमदार झाले.

यावेळी देखील अहमदनगर जिल्ह्याची संधी हुकली. मागील ३६ वर्षांपासून नगर जिल्ह्याला शिक्षक आमदारकीने हुलकावणी दिल्याचा इतिहास आहे. नेमके असे का घडते हे पाहुयात…

नाशिक विभागात नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्याचा समावेश होतो. नाशिक शिक्षक मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून म्हणजे गेल्या ३६ वर्षात नगर जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांच्या मतभेदामुळे जिल्ह्याला शिक्षक आमदारकीने हुलकावणी दिली.

या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे व अपक्ष विवेक कोल्हे यांच्यासह २१ उमेदवार उभे होते. यावेळी सरासरी ९३.४८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ९६.१२, धुळे जिल्ह्यात ९३.७७, जळगावात ९५.२६ नाशिकमध्ये ९१.६३, तर अहमदनगरमध्ये ९३.८८ टक्के मतदान झाले. असे असले तरी नगरच्या एकही उमेदवाराला यश मिळाले नाही. ३६ वर्षांची परंपरा कायम राहिली.

नगर जिल्ह्यात मतभेद
नाशिक विभाग मतदारसंघात ६५,४७५ मतदार आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात २३,५९७, अहमदनगर जिल्ह्यात १४,९८८, जळगाव जिल्ह्यात १३,२१०, धुळे जिल्ह्यात ८२६२, नंदूरबार जिल्ह्यात ५४१८ असे शिक्षक मतदार आहेत. १९८८ पासून नगर जिल्हा सध्याच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात जोडलेला आहे.

आजपर्यंत झालेल्या सहा निवडणुकांमध्ये चार वेळेस नाशिक जिल्हा, एक वेळेस धुळे व एक वेळेस जळगाव जिल्ह्याला संधी मिळालेली आहे. शिक्षकांची संघटना शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजे टीडीएफ संघटनेने पाठिंबा दिलेले सलग पाच वेळा यांचेच उमेदवार निवडून आलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये शिक्षक नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे तिकीट मिळूनही आजपर्यंत तरी संधी मिळालेली नाही.

टीडीएफमधील दुही
सन १९८८ पासून अस्तित्वात आलेल्या सध्याच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात सलग पाच वेळा टीडीएफच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. मागील निवडणुकीत टीडीएफमध्ये झालेल्या दुहीमुळे अपक्ष उमेदवार आमदार किशोर दराडे विजयी झाले होते. यावेळी देखील त्यांचा विजय झाला. पण ते यावेळी शिंदे गटाकडून उभे होते.

Ahmednagarlive24 Office