राजकारण

Ahmednagar Politics : ऍड. प्रताप ढाकणे ऍक्शनमोड वर, केला मोठा निर्धार, राजकारण पेटणार..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यांनी दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा. टक्केवारीमुळे रस्त्याची गुणवत्ता राहिली नाही. सहा महिन्यात रस्ते फुटायला लागलेत, टक्केवारीच्या घोळामुळे शेवगाव पाणी योजनेसह मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मतदार संघातील प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे २ जुलैपासून आपण शेवगाव, पाथर्डी मतदारसंघातील गावांमध्ये शिवार यात्रा काढणारा असून, त्यात वाड्यावस्त्यांवर फिरून घोंगडी बैठका घेत सर्व प्रश्न समजून घेणार आहोत.

जनतेने संधी दिली तर आमदार कसा असतो, हे दाखवून देईन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केले. शेवगाव येथे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विविध आघाड्यांची कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरीश भारदे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, वजीर पठाण, बाळासाहेब डाके,

माधव काटे,, एजाज काझी, राहुल मगरे, प्रताप फडके, आयुब पठाण, सुभाष लांडे, आप्पा मगर, इब्राहीम पठाण, संजय बडधे, रिजवान शेख, अमर पुरनाळे, बद्री बर्गे, देविदास पातकळ, नवनाथ ढाकणे, शंकर काटे, संदीप बोडखे, राजू उगलमुगले, मनोज काळे, आदी उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, मागील दहा वर्षांपासून आपण आमदार राजळे यांना मतदारसंघात केलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या कामांचा हिशोब मागत आहोत. यासाठी मी त्यांना हजार वेळा आव्हान दिले, एका व्यासपीठावर येऊ, तुम्ही तुमचा हिशोब मांडा मी त्या संदर्भातील स्पष्टीकरण देतो जनतेला ठरवू द्या, मात्र आजपर्यंत हे आव्हान त्यांनी स्वीकारलेले नाही.

रस्ते, पाणी, वीज ही लोकांची मूलभूत काम आहेत ते करण्यातही त्या दहा वर्षात सपशेल अपयशी ठरल्या. पीकविम्याबाबत राज्य सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः धुळफेक चालवली आहे. एक रुपयात पिक विमा ही घोषणा मुळातच फसवी. आहे. या मतदारसंघातल्या एकाही शेतकऱ्यांनी सांगाव एक रुपयात त्यांचा पिक विमा झाला व मोबादला मिळाला.

शेवगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्या ग्रामीण भागात आहेत. त्याचा त्रास जनतेला होतो. टक्केवारीने बरबटलेली दहा वर्षांची कारकीर्द लोकांच्या जीवावर आली आहे. लोकप्रतिनिधींना हे लक्षात कसे येत नाही. जे रस्ते झाले, त्यांचा दर्जा काय, योजना मंजूर झाल्या त्यांची कामे सुरू नाही. पाणी प्रश्न ज्वलंत आहे. त्याबद्दल आमदार राजळे का बोलत नाहीत.

त्यांच्याच गावातील तीन वीज रोहित्रे मी मंजूर करून आणली. राजळे गावातील कामे करू शकत नाहीत तर तुमचा काय विकास करणार, सामान्य माणसाला प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारावी लागतात. साधा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी दहा दहा दिवसांचा कालावधी लागतो याचा अर्थ लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही.

मागील दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधीने आपली संपूर्ण कारकीर्द टक्केवारीचा खेळात घालवली असून ढाकणे कुटुंबीय जनतेच्या विश्वासाला बांधील आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. शरद पवार हे राजकारणातील जादूगार व विचारांचे विद्यापीठ आहेत. शेतकरी बहुजन वर्ग व महाराष्ट्राच्या भल्याचा विचार त्यांनी कायम केला असल्यामुळे पडतीच्या काळात मी त्यांच्यासोबत राहिलो.

सत्ता येते जाते पण सत्य आणि विचार कायम राहतात. माझा माझा विचार जनतेचा आहे विचारांची बांधिलकी जपणारा आहे. दोन, तीन वेळेस माझा पराभव झाला पण मला लोकांनी नाकारले नाही. विजयी होण्यासाठी योग व नशीब लागते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असल्याने जनतेने दिलेला कौल स्वीकारला. लोकप्रतिनिधी यांनी जनतेसाठी सत्ता न राबवता स्वतःच्या मोठेपणासाठी राबवली.

जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे आहे. विशेषतः नगर जिल्ह्यावर शरद पवारांचे लक्ष आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाला मिळालेले मतदान उल्लेखनीय असून पक्षाने त्याची दखल घेतलेली आहे.

या मतदारसंघांमध्ये तुमच्या आमच्या मनातील प्रताप ढाकणे यांनाच उमेदवारी मिळवून देणार आहे. तसे होत नसेल तर मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईल याचे कारण लोकसभा निवडणुकीत ढाकणे यांनी खासदार लंके यांच्यासाठी जिवाचे रान केलेले आहे.

शेवगाव तालुक्यात आता वजाबाकीचे नाही तर बेरजेचे राजकारण करायचेय. ते करत असताना विधानसभेला मात्र ढाकणे यांनाच पाठवायचे, असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला. प्रास्ताविक माधव काटे यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक कुसळकर व आभार शरद सोनवणे यांनी मानले.

Ahmednagarlive24 Office