राजकारण

अहमदनगरचा झाला आणखी एक आमदार ! एकेकाळी कलेक्टर असणाऱ्या ‘या’ व्यक्तीला अजित पवारांकडून संधी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : सध्या विधानपरिषद निवडणुकीची धूम सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दोन नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये एक नाव आहे. शिवाजीराव गर्जे यांचे. शिवाजीराव गर्जे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत.

राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा म्हणजे १९९९ मध्ये शिवाजीराव गर्जे यांनी कलेक्टरची नोकरी सोडली अन शरद पवार यांची साथ देत राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते पवारांसोबत होते.

दरम्यान त्यांना अपेक्षा असणारी आमदारकीबाबत पवारांकडून निराशा झाली पण आता अजितदादांनी त्यांना विधानपरिषद देत आपला शब्द पूर्ण केलाय. कलेक्टरची नोकरी सोडली.. पवारांकडून निराशा..तर थेट अजितदादांकडून विधानपरिषद.. पाहुयात शिवाजीराव गर्जे यांचा संघर्षमय प्रवास..

१९९९ साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडत स्वतःचा पक्ष स्थापन केला. यावेळी त्यांना काँग्रेसमधील अनेक दिग्गजांची साथ मिळाली. सुधाकरराव नाईक, विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील शरद पवार यांना साथ देत त्यांचे पारडे जड केले.

त्याच सुरवातीच्या काळात एका जिल्हाधिकाऱ्याने राजीनामा दिला अन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांसाठी राजीनामा देणारे हे अधिकारी आहेत शिवाजीराव गर्जे. आता याच गर्जे यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानपरिषदेची आमदारकी दिलीये.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणास वैतागलेल्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ दिली. त्या काळात शिवाजीराव गर्जे यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. शिवाजीराव गर्जे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे. पाच किमीची पायपीट करत त्यांनी शिक्षण घेतले.

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये एम.ए. पर्यंत शिक्षण झाले. १९७७ ते १९८० पर्यंत प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९८० मध्ये ते तहसीलदार झाले. त्यांचे प्रशासनातील उत्तम काम पाहता त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी जवळपास दोन दशके नोकरी केली.

त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत झोकून दिले. १९९९ पासून शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या ए बी फॉर्मवर देखील गर्जे यांचीच सही असते. २००९ पासून त्यांना विधानपरिषदेची अपेक्षा लागलेली. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत शिवाजीराव गर्जे यांचे देखील नाव होते. पण राज्यपालांकडून मंजुरी मिळाली नाही.

त्यानंतर राष्ट्रवादीमधील बंडखोरीनंतर शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार यांना साथ दिली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

साध्याचे अजित पवार गटाचे बलाबल पाहता शिवाजीराव गर्जे हे आमदारही होतील असे मानले जात आहे. अखेर त्यांच्या कार्याचे फळ त्यांना मिळेल याचे समाधान कार्यकर्त्यांत आहे.

Ahmednagarlive24 Office