Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अहमदनगरमधील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अनेक दिग्गजांना आपल्याबाजूने करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.
दरम्यान त्यांनी आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एक राजकीय डाव टाकला आहे. यावेळी त्यांनी आपले पुतणे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिलाय.
रोहित पवारांचे कट्टर समर्थक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सध्या आ. रोहित पवार हे सध्या लोकसभेच्या प्रचारासाठी आजोबा शरद पवार यांच्यासोबत कंबर कसत आहेत.
विविध ठिकाणी ते धडाकेबाज सभा घेत आहेत. एकीकडे त्यांचा झंजावात सुरु असतानाच कट्टर समर्थक अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत अक्षय शिंदे?
अक्षय शिंदे हे अगदी सुरवातीपासून आ.रोहित पवार यांच्या सोबत आहेत. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेतच शिवाय त्यांनी आजवर रोहित पवारांना साथ दिली होती. परंतु मागील काही काही दिवसांपासून रोहित पवार व अक्षय शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता असे म्हटले जात आहे.
यातूनच त्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. अक्षय शिंदे यांनी मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
रोहित पवारांचा काकांवर हल्लाबोल
आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय झाले असून ते अजित पवार यांच्यावरही घणाघात करताना दिसतात. नुकताच त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले होते की, तिकडे मलिदा गँग असून इकडे जनता असल्याने जनता विरुद्ध नेता अशी लढत आता होईल.
आधी पक्ष चोरीला गेला त्यानंतर चिन्ह चोरी झाले. लोकसभेच्या सहा महिन्यांआधी सर्व यंत्रणा देखील चोरीला गेली असल्याचे ते म्हणाले. तसेच ती यंत्रणा अजित पवार स्वतःसाठी वापरत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता.