Ahmednagar Politics : महाराष्ट्रात आता आगामी विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. एकीकडे महायुती एकत्रित असल्याचा दावा केला जात असला तरी आता अजित पवार गट स्वातंत्र्य लढणार असल्याचे सूतोवाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केलेय.
त्यामुळे आता नगर शहरात आ. संग्राम जगताप , महाविकास आघाडी व भाजप अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आता अजित पवार गट हा महायुतीसोबत नसेल तर विधानसभेतही विधानपरिषदेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देऊन स्वबळावर लढेल अशा चर्चा आता सुरु झाल्यात.
लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील विधानसभेची तयार सुरू केली असून नगर जिल्ह्यापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला सुरूवात केली आहे. आता दोन दिवस खा. तटकरे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्याची माहिती देण्यासाठी नाहाटा हे पत्रकारांशी बोलत होते.
त्यावेळी नगर शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष संजय कोळगे, अभिजीत खोसे उपस्थित होते. नाहाटा म्हणाले की, खा. तटकरे यांच्या उपस्थितीत दि. १८ रोजी सकाळी नगर शहराची प्रथम बैठक होईल. त्यानंतर नगर दक्षिण जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.
शहरातील वृदांवन लॉन येथे ही बैठक होणार असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल. त्यानंतर खा. तटकरे हे श्रीरामपूर व नेवासा या दोन मतदारसंघाची श्रीरामपूर येथे बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी दि. १९ रोजी कोपरगावमध्ये कोपरगाव व शिर्डी तर अकोले येथे अकोले व संगमनेर या दोन मतदारसंघाची बैठक होणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबतही माहिती या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे नाहाटा यांनी सांगितले. मात्र त्यांनी त्यात लगेच सुधारणा करून स्वबळावर लढणार नाही पण परिस्थिती काय निर्माण होईल, हे आता सांगता येत नाही. त्यानुसार पक्ष तयार असणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.