Ahmednagar Politics : नगर लोकसभा मतदारसंघातून जनतेने मला भरभरुन मतदान केले. श्रीगोंदा तालुक्याने माझ्यावर विशेष विश्वास दाखविला. आता मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू, अशी भूमिका नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी मांडली.
राजकारणात लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर स्वतःला राजा समजतो आणि प्रजेला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचे असून त्यांचेकडून जनतेचे काम योग्य प्रकारे होत नसल्याचे माझ्या जनतेला मी राजा समजतो तसेच मी त्यांचा सेवक असल्याने त्यांचे काम प्रामाणिक करणार तसेच येणाऱ्या काळात मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणार आहे असेही ते म्हणाले.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालानंतर श्रीगोंदा तालुक्याचा गुरुवार दि.६ रोजी दौरा सुरू केला. यावेळी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील
विविध गावामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच गुलालांची उधळण करत कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खा. लंके यांचे जंगी स्वागत केले. खा. लंके यांनी राष्ट्रसंत श्री शेख महंमदबाबा मंदिरात जाऊन बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
कुकडी पाणी अन् साकळाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम
यावेळी खासदार लंके म्हणाले, श्रीगोंदेकरांनी मताधिक्क्यात पारनेरची बरोबरी केली. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी पाणी अन् साकळाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात येईल तालुक्यात सुशिक्षीत बेरोजगारांचा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघात आवश्यक ठिकाणी एमआयडीसी उभारण्यावर भर देऊन तालुक्यातील तरुणांना त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास प्रयत्न करणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगून आचारसंहिता संपली की कांदा आणि दूध भाववाढीवर मोठे आंदोलन करणार आहे. शेतकरी हाच आपला श्वास असल्याचे खासदार लंके यांनी यावेळी स्पष्ट केले.
डिंबे-माणिकडोह बोगदा अजेंड्यावर
खासदार लंके म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यासाठी कुकडीचा पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात एक वाढीव आवर्तन होण्यासाठी डिंबे ते माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे. आगामी काळात हा विषय आपल्या अजेंड्यावर राहणार आहे.
इतर प्रश्नही सोडवणार
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर मतदार संघात आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेच्यावेळी फिरताना मतदार संघात पाणी प्रश्न, बेरोजगारी, शेतीमालाचे बाजार भाव यासारखे अनेक गंभीर प्रश्न आढळून आले. आचारसंहिता संपल्यानंतर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसाठी ज्वलंत प्रश्न असलेल्या कांद्याची निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करतानाच कांद्याला
योग्य बाजार भाव मिळावा तसेच दुधाचे बाजारभाव वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करणार, मतदारसंघातील बेरोजगारी कमी करण्यासाठी मतदार संघात औद्योगीकरण वाढविण्यावर भर देण्याबरोबरच संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.