महायुतीत मिठाचा खडा पडणार ? अजित दादा गटातील अनुराधा नागवडे म्हणतात ‘विकास हवा तर आमदार नवा’ ; नागवडेंच्या तयारीने बीजेपी अस्वस्थ

श्रीगोंदा ची जागा महायुतीत भाजपाच्या वाटेला येणार आहे. येथून भाजपाचे बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा भाजपाकडे येईल आणि येथून पुन्हा एकदा पाचपुते उभे राहतील अशी शक्यता आहे. मात्र या जागेसाठी अजित पवार गटातील अनुराधा नागवडे यादेखील इच्छुक आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहकाराची पंढरी, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्याने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. यामुळे काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित मविआचा कॉन्फिडन्स वाढलाय.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्मात असून त्यांनी विधानसभेचा गड काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

लोकसभेत जसा अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कौल मिळाला तसाच कौल आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला मिळेल आणि मविआ सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास मविआच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

पण, अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून कसून तयारी सुरू करण्यात आली आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. खरे तर महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला आणला आहे. म्हणजे विद्यमान आमदारांच्या पक्षालाचं ती जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार श्रीगोंदा ची जागा महायुतीत भाजपाच्या वाटेला येणार आहे. येथून भाजपाचे बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत. यामुळे ही जागा भाजपाकडे येईल आणि येथून पुन्हा एकदा पाचपुते उभे राहतील अशी शक्यता आहे. मात्र या जागेसाठी अजित पवार गटातील अनुराधा नागवडे यादेखील इच्छुक आहेत.

नागवडे अजूनही अजितदादा यांच्या गटात आहेत, त्या महायुतीचा एक भाग आहेत. मात्र असे असले तरी त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदार संघात ‘विकास हवा, तर आमदार नवा’ अशी टॅगलाईन वापरत जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मतपेरणीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.

यामुळे नागवडे विधानसभा निवडणुकीसाठी नेमकी काय भूमिका घेणार, त्या अजित दादा गटातून बाहेर पडत अपक्ष उमेदवारी करणार की महाविकास आघाडी मध्ये जाऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.

दुसरीकडे अनुराधा नागवडे यांच्या या तयारीमुळे बबनराव पाचपुते सहित भाजपाच्या खेम्यात कमालीची अस्वस्थता पाहायला मिळते. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनुराधा नागवडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असल्याचे दिसते. महायुती मध्ये असतानाही ‘विकास हवा तर आमदार नवा’ अशी टॅगलाईन घेऊन ते मतदार संघातील लोकांमध्ये जात आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामुळे ही जागा महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटणार आणि कोण उभे राहणार हे सारं काही जेव्हा उमेदवारांची नावे समोर येतील तेव्हाच क्लियर होणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe