Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडी व महायुतीमध्येच फाईट होणार आहे. महाविकास आघाडीचे जवळपास जागावाटपाचा फुर्म्युला ठरलेला आहे. जेथे स्टँडिंग आमदार आहे तेथे तो उमेदवार फिक्स असणार आहे.
या सूत्रानुसार कर्जत जामखेड मध्ये आ. रोहित पवार यांचे तिकीट फिक्स समजले जाते. परंतु आता त्यांच्या आमदारकीच्या तिकिटालाच अर्थात ती जागा रोहित पवार यांना सोडण्यास त्यांच्याच आघाडीतील पक्षांचा विरोध होत आहे. सुरवातीला काँग्रेसने उघड विरोध करत ती जागा काँग्रेसला सोडावी असे सांगितले.
आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानेही आमदार रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीला विरोध केला आहे. रेहेकुरी (ता. कर्जत) येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कर्जत तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी असेही जाहीर केले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व २८८ जागी उमेदवार देण्याचे ठरविले, तर आमच्याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात सक्षम उमेदवार
असून येथे आम्ही भगवाच फडकवू. परंतु यावेळी असेही सांगितले गेले की, जर महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा आदेश मातोश्रीवरून आला तर तेही काम आम्ही करू.
तक्रारींचा पाढा
रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील शिवसेनेबाबत कधीही आघाडी धर्म पाळला नाही. तालुकाप्रमुख असो किंवा पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली विकासकामे केली नाहीत. सत्ता असतानाही सेनेच्या मंत्र्यांकडून निधी आणून मंत्र्यांना निमंत्रित करून कामाची उद्घाटने केली.
मात्र, तालुक्यातील सेनेला कधी साधे निमंत्रणही दिले नाही. कर्जत नगरपंचायतीला एकही जागा दिली नाही. अर्ज बाद केले. काहींना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले.
त्यांनी सेनेचे नेहमीच खच्चीकरण केले. मुंबईला शिवसेना पक्षश्रेष्ठींबरोबर सलोख्याचे संबंध ठेवायचे आणि तालुक्यात दुय्यम दर्जाची वागणूक द्यायची, अशा तक्रारी यावेळी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या.