Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अहमदनगरमध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागा जिल्ह्यात येतात. दरम्यान महायुतीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील या लोकसभेच्या जागा वाटपावर मंथन सुरू आहे.
तत्पूर्वी मात्र दोन्ही जागांसाठी निवडणूक लढवू इच्छिनाऱ्या इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. दोन्ही गटांमध्ये म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या वाढत आहे. यामध्ये नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर सध्या या जागेवरून भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत.
हे पण वाचा : नगर अर्बन बँक घोटाळा : ‘त्या’ 58 आरोपींची मालमत्ता जप्त होणार, घोटाळ्यातला एक बडा आरोपी फरार
दरम्यान आगामी निवडणुका पाहता खासदार महोदय यांनी त्यांच्या मतदारसंघात डाळ वाटपाचा आणि साखर वाटपाचा कार्यक्रम देखील हाती घेतला होता. साखर वाटपाच्या माध्यमातून त्यांनी एका प्रकारे मत पेरणी सुरू केली होती. शिवाय ते सध्या मतदारसंघात ठिकठिकाणी भेटी देत आहेत.
महायुतीमध्ये नगर दक्षिणची जागा भाजपाच्या वाटेला जाणार असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, अजूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि या जागेवर पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
मात्र सुजय विखे पाटील यांना महाविकास आघाडीमधून आव्हान मिळण्याअगोदर स्व पक्षातून आणि महायुतीतील घटक पक्षांमधून आव्हान मिळू लागले आहे. स्व-पक्षातील आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण वरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हे पण वाचा : नगरसेवक युवराज पठारे हल्ला प्रकरणी तिघे ताब्यात, महत्वाची माहिती समोर
दुसरीकडे महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान याबाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील मौन सोडले आहे.
प्रसारमाध्यमांनी स्व-पक्षातील आमदार राम शिंदे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या आव्हानाबाबत डॉक्टर सुजय विखे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
सुजय विखे यांनी मी अजून नगर दक्षिण लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार नाही. पण पक्षाने मला तिकीट दिलं की जे आव्हान समोर येईल ते पेलण्याची क्षमता आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असे म्हटले आहे.
एकंदरीत पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर आमदार राम शिंदे असो की आमदार निलेश लंके यांचे आव्हान पेलण्यासाठी मी सक्षम आहे, त्यांचा सामना करण्यास मी सज्ज आहे असा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.