Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच वरचष्मा राहिला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार काका पुतण्यांनी दोघांनीही जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व कसे राहील याकडे लक्ष दिले.
दरम्यान लोकसभेला शरद पवार यांना मिळालेल्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे नव्याने कामाला लागले आहेत. त्यांनी एकाच फटक्यात आ. तनपुरे, खा. लंके यांसह शरद पवार गटास धक्का दिला आहे.
तनपुरे कारखान्याच्या माजी संचालिका तसेच स्व. रामदास धुमाळ यांच्या स्नुषा शैलजा धुमाळ यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या राहुरी महिला तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमृत धुमाळ हे नीलेश लंके यांच्यासोबत होते. त्यांनी तनपुरे यांच्या प्रमाणेच अगदी मनापासून लंके यांचे अर्थात शरद पवार गटाचे काम केले. परंतु आता मात्र महिला तालुकाध्यक्ष म्हणून त्यांच्या सौभाग्यवतींच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभेच्या अनुशंघाने राहुरी मतदार संघामध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राहुरी मतदार संघामध्ये पदाधिकारी निवडीने वेग धरला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना धक्का देण्यासाठी सरसावलेल्या अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून महिला तालुकाध्यक्ष म्हणून तनपुरे कारखान्याच्या माजी संचालिका तसेच स्व. रामदास धुमाळ यांच्या स्नुषा शैलजा धुमाळ यांना उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खा. सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्षा नागवडे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
राहुरी कारखान्यास मदत मिळेल?
धुमाळ अजित पवार गटात गेल्याने आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राहुरी कारखान्यास मदत देणार का? की तसाच काही शब्द दिलाय अशा चर्चा या निमित्ताने सुरु झाल्या आहेत. ही मदत झालीच तर तीन हंगामापासून बंद असलेला राहुरी कारखाना सुरू पुन्हा होताना दिसेल.