एकट्या पोखर्डी गावासाठी नऊ कोटी रुपयांचे विविध विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून होत आहेत. सध्या खासदारकीच्या निवडणुका लढवण्याची काहींना घाई झाली आहे.
पण खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे पाटील घराणेच लढवून जिंकू शकतात. अनेक लोक आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही बांधलेल्या सभागृहामध्ये त्यांना बैठका घ्यायची वेळ आली असल्याची टीका माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांवर केली.
नगर तालुक्यातील कापुरवाडी येथील आलमगीर-कासार मळा- कापुरवाडी रस्ता व जलसंधारण विभागाअंतर्गत बंधारे कामांचा आणि पोखर्डी (ता. नगर) येथील विविध विकास कामांचा शुभारंभ खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजीमंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी श्री. कर्डिले बोलत होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, नगर भाजपाचे नगर तालुकाप्रमुख दीपक कार्ले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले की, आमच्या माध्यमातून होत असलेल्या कामात टक्केवारी बंद झाली. निवडणुका जवळ आल्या की आरोप-प्रत्यारोप होत राहतात. आरोप करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर देवू.
त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कर्डिले, भाजप जिल्हा अध्यक्ष भालसिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.