Ahmednagar Politics : विखेंना टक्कर देण्यासाठी कोल्हे भाजपमध्ये बंड करणार, पक्षाकडून नव्हे तर थेट अपक्ष मैदानात उतरणार?

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe kolhe

Ahmednagar Politics : अहमदनगरचे राजकारण व नाराजांची मनधरणी लोकसभेला मोठा चर्चेचा विषय ठरली. माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील किंवा आ. राम शिंदे असतील यांची विखेंविषयी असणारी नाराजगी दूर करण्याकरता वरिष्ठांना चांगलीच कसरत करावी लागली. दरम्यान ही रणधुमाळी शांत होतेना होते तोच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली.

यासाठी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते उतरणार असे चित्र दिसून येत आहे. त्यासाठी ते तयारीला देखील लागले आहे. मागील काही दिवसात विवेक कोल्हेंनी शिक्षक संघटनांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे.

दरम्यान डॉ. राजेंद्र विखे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे कोल्हे यांना भाजप तिकीट देणार की पुन्हा एकदा विखे हे तिकीटही मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जर त्यांना भाजपने तिकीट दिल तर विवेक कोल्हे कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अपक्ष उमेदवारी करणार? याबाबत मतदारांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारांसह सर्वच राजकीय नेत्यांनी कंबर कसली असून दुसरीकडे मात्र विवेक कोल्हे हेही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

कोल्हे -विखे राजकीय वैर
विवेक कोल्हे यांनी भाजपात राहून वेळोवेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतली. गणेश कारखाना ताब्यात घेतला त्यानंतर विखेंच्या मतदारसंघातील तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.

त्यामूळे कोल्हे आगामी विधानसभा निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा होती. अशातच विवेक कोल्हेंनी नाशिक शिक्षकच्या रिंगणात उडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या अनेक प्रचार सभांमध्ये कोल्हे दिसले नव्हते त्यानंतर महायुतीतील दिग्गज नेत्यांनी कोल्हे कुटुंबाची भेट घेऊन मनधरणी केली

त्यानंतर कोल्हे परिवार महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत कोल्हेंचा रुसवा विखेंमुळे होता की नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी? असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

पक्षात बंड करणार?
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अनेक वेळा सत्ताधारी पक्षात असताना सरकार विरोधात आंदोलने केली. तसेच मागील काही काळात विवेक कोल्हे देखील आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसून आले असून जनतेच्या प्रश्नासाठी भाजपात असताना देखील भाजपाच्या नेत्याविरोधात अर्थात पालकमंत्री विखे पाटलांच्या विरोधात शिर्डीत मोर्चा काढला.

दरम्यान आता जर विखे यांनी कोल्हे यांना शह देत भाजपचे तिकीट मिळवले तर विखेंना टक्कर देण्यासाठी विवेक कोल्हे भाजपमध्ये बंड करतील का? पक्षाकडून नव्हे तर थेट अपक्ष मैदानात उतरली का? अशा पद्धतीच्या चर्चा नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe