राजकारण

विधानसभेला अहमदनगरमध्ये कोणत्या मतदार संघात किती मतदार? सगळी आकडेवारी आली, पहा सविस्तर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्र मतदार याद्यांचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमानुसार ३० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बारा मतदारसंघासाठी पुरुष, स्त्री व इतर असे एकूण ३७ लाख २७ हजार ७९९ मतदार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम ऐकू येऊ लागले आहेत.

यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या संचालनात जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची सुसज्जता, मतदानासाठी आवश्यक असलेल्या मतदान संयंत्रांची तपासणी प्रक्रिया संपन्न झाली.

याच दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी ६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. दि.६ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी होता.

या दरम्यान १०,११,१७ आणि १८ ऑगस्ट या चार शनिवारी बाराही विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. दि.२९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात आल्या असून आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.३०) मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे.

सहा ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात एकूण ३६ लाख ७३ हजार ९६९ मतदार होते. द्वितीय विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानंतर शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात एकूण ५३,८३० मतदार वाढले आहेत.

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या दिशानिर्देशात उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे यांच्या पाठपुराव्यात जिल्ह्यातील सर्व मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार,

प्रत्येक तहसील मधील निवडणूक नायब तहसीलदार आणि जिल्ह्यातील सर्व बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी या कामी परिश्रम घेतले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सैनिक मतदारांची देखील नोंदणी करण्यात आली. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदार सैनिकांची संख्या ३० ऑगस्ट अखेर ९ हजार ६८७ इतकी आहे.

दरम्यान १ सप्टेंबर २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांची नाव नोंदणी सुरु राहील. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरून द्यावा. सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

विधानसभानिहाय मतदारसंख्या
अकोले २६२९४२, संगमनेर २८५०४०, शिर्डी: २८८२१६, कोपरगाव २८५५०१, श्रीरामपूर : ३०५३२६, नेवासा २७९६९४, शेवगाव-पाथर्डी: ३६८७४३, राहुरी : ३१७४६४, पारनेर ३४५९७०, अहमदनगर शहर ३११३४४, श्रीगोंदा ३३४६६५, कर्जत-जामखेड : ३४२८९४

Ahmednagarlive24 Office